माकड ,बैल , घुबड ,नर्मदेचा गोटा ई. ज्यांच्यावर मराठी भाषेने अगदी सुरुवातीपासून घोर अन्याय केला आहे त्यांच्या यादीत सर्वात पहिलं येणार नाव म्हणजे "गाढव". गाढवावरचा हा सांस्कृतिक तसेच भाषिक पातळीवरचा होणारा अन्याय आणि अपमान पाहून आमच्या मनाला ज्या यातना होत आहेत त्या फक्त एक गाढवच समजू शकेल(तोही अस्सल उकीरड्यावरचा असेल तरच !)
तस पाहिलं तर गाढव आणि आमच्यातल साधर्म्य जगाने आमच्या जन्मापासूनच किंबहुना त्या आधीच ओळखल असावं (महाभारतातल्या आभिमन्युसारख्या आमच्याही चेतना गर्भावस्तेत जागृत होत्या. फरक इतकाच कि तो हुंकार द्यायचा आणि आम्ही लाथा मारायचो.पण त्याच मात्र किती कौतुक आणि आम्हाला मात्र "गाढव मेला " म्हणून शिव्याशाप). अशीच एक लाथ आम्ही जन्मल्या जन्मल्या आमच्या आजीला मारली अस ऐकून आहोत.
असो प्रश्न इथे आमचा नाही तर गाढवावरील अन्यायाचा आहे. गाढव म्हणजे गावातला "ढ" ही संकल्पना पूर्वापार रूढ झाली आहे.गाढव म्हंटला कि लगेच कामचुकार,आळशी,मूर्ख,निर्बुद्ध,आयतखाऊ ई .ई. विशेषणांची जंत्री समोर येते.दूर कशाला जाता आमचंच बघा ना, शाळेत असतानाही मास्तर ( काही लोकांसाठी गुरुजी/शिक्षक असतील तर मास्तर वापरल्यामुळे क्षमस्व)....... हां तर; मास्तर मला रोज " गाढवातला गाढव ही तुझ्यासारखा गाढवपणा करणार नाही " असं सारख म्हणत . तेंव्हा त्यांना संदर्भासहित स्पष्टीकरण द्या असं म्हणण्याची आमची काय बिशाद ... शब्द चुकला बघा बिशाद च्या ऐवजी " टाच "असं वाचाव वाचकांनी . (गाढवांवरील असीम सहानुभूतीमुळे आम्हाला टाच ,पाय, लाथा या शब्दांच विशेष आकर्षण आहे). तर मग त्यावेळेस आमच्या बाल-समजुतीप्रमाणे आम्ही गाढवातही काही शहाणी गाढवं असतात असा समज करून
घेतला.अर्थात इथे शहाण्या गाढवांचा विषय नाही आम्हास चिंता आहे ती इतर सर्व गाढव बंधूंची (भगिनींचा समावेश पण यात आहे अस गृहीत धराव,स्त्री-पुरुष समानता हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण त्याबद्दल नंतर कधी .....) असो पुढे बाल्यावस्थेतून थोड फार " वयाने वाढलो" आम्ही , हो जाणूनबुजून वाढलो असा शब्दप्रयोग केला आहे कारण कोणी आम्हाला मोठ झाला अस कधी म्हटलंच नाही.हाही आमच्यावरचा गाढव-सदृश अन्याय.असो मागची पुढची गोष्ट मनाला न लाऊन घेता आपापला चिखल तुडवत राहायचं ही शिकवण आम्ही गाढवाकडून शिकलोय.
तर मग जसे जसे आम्ही वाढत गेलो तसा आमचा गाढवपणा ही वाढत गेला , मग "जातीवंत गाढव", "गाढव मेला" अशी विशेषणं अंगवळणी पडली ती पडलीच.यातून आमचा आणि गाढवांचा ऋणानुबंध उत्तरोत्तर घट्ट होत गेला. गाढवांचे गुणधर्म कळत गेले. नेहमी आपण म्हणतो , " गाढवाला गुळाची चव काय? " -- आता
बघा, मुळात गाढवाला कोणी गूळ खाऊ घालताना किंवा गाढव गूळ खाताना मी तर पाहिलं नाही.आणि समजा जरी आपण मान्य केलं कि चला गाढवाला गुळाची खरच चव नाही तर यातून गाढवाच अनासक्त योगी पण सिद्ध होत. त्याच्यासाठी पंचपक्वान ( इथे गाढवासाठी पंचपक्वान म्हणजे गूळ ) सुद्धा चवहीन(testless हो) त्याच्यासाठी उकीरड्यावरचा कागद ,कचरा आणि गूळ हे सगळे एकच.जगातल्या सर्व सुखसोयींचा त्याग करून वल्कल नेसणारा , जीभेवर पूर्ण नियंत्रण मिळवणारा ,स्वच्छता टापटीपपणा या भौतिक गोष्टीत न अडकता ध्यानस्थ होणारा तो योगी आणि तसाच वागणारा हा प्राणी म्हणे गाढव.घोर अन्याय आहे हा!!
" गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता" अशीच काहीबाही म्हण आहे .आता इथे आपण थोडस मानून चालू की गाढव ते गाढव अरे मग तुम्ही शहाणे आहात ना मग गाढवापुढे गीता वाचलीतच का?......आणि तुम्ही काय स्वतःला ज्ञानेश्वरांचे अवतार समजता की काय ? आता गोंधळाचे म्हणाल तर त्यातून गाढवाचा रसीकपणाच दिसून येतो( इथे दाद फक्त त्याने त्याच्या भाषेतून दिली; भाषास्वात्यंत्र आहे आपल्या देशात अजून)
गाढवाचा गाढवपणा लहानपणा पासूनच मनावर बिंबवण्यासाठी सांगण्यात येणारी एक गोष्ट सर्वार्थाने कशी चुकीची आणि पूर्वग्रहदुषित आहे हे इथे सांगणे संयुक्तिक ठरेल.अहो तीच ती गोष्ट हो --- एक गाढव रोज पाठीवर मीठ वाहून नेत असे , रस्त्यात एक नदी लागे , गाढव मग नदीत उतरे,मीठ पाण्यात वाहून गेल्यामुळे पाठीवरच ओझ कमी होई वगैरे वगैरे . आता तुम्हीच पहा मीठ लाद्न्यागोदर मालकाने गाढवाला विचारलं होत का? गाढवाच्या मर्जीविरुद्ध जर मीठ लादल गेल असेल तर हा अन्याय नाही का? (इथे गाढवाचेच आभार मानायला हवेत; अहो का ? अस कस विचारता मेनका गांधीना विसरलात वाटत ). आता दुसरा मुद्दा असा की ,मालकाने गाढवाजवळं waterbag दिली होती का पाणी प्यायला? तहान लागल्यावर नदी ,डबके
इकडेच जाणार तो , आता नदीवर गेल्यावर थोडा आंघोळीचा वगैरे मूड झाला तर तो पाण्यात उतरणारच ना? हे तुमच बर आहे आंघोळ केली तर त्याला तुम्ही कामचुकार म्हणणार आणि नाही केली तर घाणेरडा. अजून तर काहीच नाही अन्यायाची परिसीमा पुढेच आहे , नंतर म्हणे मालकाने गाढवाला अद्दल घडवायला त्याच्या पाठीवर कापूस लादला, नदीत उतरल्यावर कापूस भिजून जड झाला आणि गाढवाच्या पाठीवरच ओझ वाढल.
आणि गाढवाच कंबरड मोडल. धिक्कार, धिक्कार इथे गाढवाच चुकल अस आम्हाला वाटत नाही ,देवान त्याच्या शरीराची रचनाच अशी केली आहे की त्याला पाठीवर काय आहे हे पाहता येत नाही त्याला काय माहिती की पाठीवर मीठ आहे की कापूस.इथे गाढवाचा प्रामाणिकपणा पहा त्यानं पाठीवरचा खूराक खाल्ला नाही (अहो कापूस हो) . शेवटी गुळाची जाऊ द्या हो मात्र गाढवाला " मालकाच्या खाल्लेल्या मिठाची" चव आहे हेच सीद्ध होत इथे.
तर नेहमी खाली मान घालून चालणारा , कधीही तक्रार न करणारा , न लाजता उकीरडे फुंकणारा , चालता चालता चुकून एखाद्याला किंवा एखादीला (स्त्री पुरुष समानता विसरलात वाटत) लाथ मारणारा (मुद्दामहून पायात पाय घालून पाडण्यापेक्षा हे हजार पटीने बर आहे ) गाढव आम्हाला नेहमीच आमच्या अंतरंगाच प्रतिबिंब वाटत आलाय .
त्यामुळ हे मानवांनो जागे व्हा आणि आपलं माणूसपण सांभाळा; नाहीतर मी सर्व जातिवंत गाढवांचा प्रणेता जाहीर करतो की गाढव आपल्या "गाढवपणा" सह या धरतीचा भार उचलण्यास सज्ज आहेत .
----- आपला गधर्भराज .
** टीप
त्यामुळ हे मानवांनो जागे व्हा आणि आपलं माणूसपण सांभाळा; नाहीतर मी सर्व जातिवंत गाढवांचा प्रणेता जाहीर करतो की गाढव आपल्या "गाढवपणा" सह या धरतीचा भार उचलण्यास सज्ज आहेत .
----- आपला गधर्भराज .
** टीप
देवान "गधर्भरास " नावाचा नवा ब्रांड चालू केला आणि त्याच पाहिलं आणि शेवटचं product म्हणून आम्हाला या मृत्युलोकात पाठवलं.